Friday, September 19, 2008

सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...

परवा पुलंच मी मुंबईकर, पुणेकर आणि नागपुरकर ऐकत होतो.. राहुन राहुन मला माझ्या कॉलेजची आठवण झाली.. सांगलीच्या आमच्या वालचंद कॉलेजमध्ये असेच ढोबळमानाने वेगळे काढता येण्यासारखे तीन ग्रुप होते..
सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...
तुम्हाला सांगलीकर ग्रुप मध्ये जायचं आहे का? तर मनाची फ़ार तयारी करुन जा.. पदोपदी अपमान आणि चेष्टा सहन करण्याची ताकद जमवुन घ्या आणि जरुर हा ग्रुप जॉईन करा. कॉलेजमधली आठपासुनची सगळी लेक्चर्स ओळीने करण्याचा संयम बाळगुन रहा. कॉलेजला येवुन लेक्चर चुकवणं म्हणजे संकष्टीला गणपती मंदिरासमोर जावुन वडापाव खावुन उपवास मोडण्याइतकं पाप वाटतं या लोकांना.. आठच्या लेक्चरला जाउन मागे झोपा काढतील.. सरांच्या चुका काढतील.. तोंडावरची माशी कंटाळून उडुन जाईल असल्या पोरि बघत बसतील.. पण लेक्चर चुकवणं .. अंहं..
या ग्रुपमध्ये जायचं तर तुमचा स्वाभिमान प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळुन सॅकमध्ये ठेवुन टाका.. आणि मग चला.. कारण हे लोक एकमेकांना कशावरुन चिडवतील हे सांगता येत नाही.. रंग, रूप, जात, पात, धर्म, वर्ण, बुद्धी या कशाचीही तमा यांच्या ठायी नाही.. खरं तर असली तारतम्यरुपी बंधनं पाळणं हे यांच्या स्थायीभावातच नाही. म्हणजे यांच्या ग्रुप मध्ये खऱ्या नावाने कोणीही कोणाला बोलवत नाही.. इतर ठिकाणी फ़ार फ़ार तर नावाचा अपभ्रंश होतो मात्र इथं एकंदरीत व्यक्तीमत्वाचा अपभ्रंश करुन नावं ठेवतात.. ठेवतात म्हणजे काय अशी ठेवतात की लोकं नावं ठेवायलाही असली नावं वापरणार नाहीत.. या बाबतीत सांगली-मिरजकरांची प्रतिभा वाखानण्यासारखी आहे.. खरी नावं रगिस्टरमध्ये अडगळीत धुळ खात पडुन रहातात.. ती इतकी विस्मृतीत जातात की कुठंतरी proxy मारताना आपल्या झिंग्याचं खरं नाव काय रे? असा संभ्रम होतो कधी कधी.. आता हा झिंग्या म्हणजे कुठंतरी आपल्याच तंदरीत रमणारा एकटा एकटा राहणारा मुलगा आहे हे समजुन घ्यायचं.. दात पुढे असणाऱ्याला ’तारे जमिन पर’ म्हणतील. उंची कमी असणारा छोटा छ्त्री असतो.’धुमकेतु’ हे नाव तुमच्या मते एखाद्याला का पडलं असावं, तो कॉलेजमध्ये कधीतरी दिसतो म्हणुन.. हा ग्रुप लेक्चरर्सना देखिल यातुन मुक्ती देत नाही.. एखाद्या फ़ारच पुरुषी आवाज असणाऱ्या मॅडमना ’बजाज पल्सर’(definitely male), किंवा मुळातच हसरा चेहरा असणाऱ्या सरांना विक्टर (more smiles per hour) म्हणतील. अतिशय जाड असणाऱ्या मेकॅनिकल च्या सरांना बॉयलर म्हणत..
बॅटरी, चपण्या, ढापण्या, नकट्या ही असली मुळमुळीत नावे श्रीयुत किंवा माननीय अशी आदरार्थी धरावीत इथं.. हे लोक चिडवण्यात जंगिझ खान इतके निर्दयी आहेत. म्हणजे एखाद्या डावखुऱ्याला तू नेमकं कोणत्या हाताचा वापर कशासाठी करतोस इतकं विचारायलाही कमी करत नाहीत. एखाद्या रंगात मार खाणाऱ्या मुलाला तोंडावर काळ्या म्हणण्याचं आणि ते पचवण्याचं धैर्य इथंच पहायला मिळतं. पंढरीच्या विठ्ठलाला काळा म्हणावं इतकं सहजासहजी हे लोक त्याला काळ्या देसाई म्हणुन हाका मारतात.. आणि याचं त्यालाही काही वाटत नाही. पण हे त्याच्या रुखुमाई समोर झालं तर मात्र त्याचा चेहरा बघण्यासारखा होतो.. तुम्हीच कधीतरी दयेने उगीच तोंडावर नैतिकता आणुन “इतकाही सावळा नाहिस तु..” असं काहीतरी म्हणायला जाल आणि त्याच्या काळ्या कपाळावरच्या आठ्याही स्पष्ट पहाल..
सांगली-मिरजकर कॉलेजला मस्त दोन कप्पी डबा आणतात घरातुन.. झाडाखाली किंवा कॅंटीनमध्ये तो पुर्ण संपवतात आणि हॉस्टेलवर तुमच्या रुममध्ये येवुन विचारतात "या आठवड्यात घरी जाउन आलास ना.. घरुन काही खायला आणण्याची पद्धत?"
कॅंटीनमध्ये तुमच्या पैशाचा चहा ढोसतील आणि "छ्या.. कसला चहा पाजलास लेका.. तु मिरजेला ये एकदा चहा प्यायला.. असा चहा पाजतो, असा चहा पाजतो.. रोज येशील मिरजेला.." बोलवुन बोलवुन चहाला बोलवतात..दोन रुपयांचा चहा प्यायला आठ रुपयांच तिकीट काढुन कोणीही मिरजेला येण्याची यत्किंचितही शक्यता नाही हे आधीच माहीत असतं..
भाषावैशिष्ट्यांमध्ये सांगायचं तर सांगली मिरजेने मराठीला दिलेली एक बहुपयोगी देणगी म्हणजे मारणे.. मारणे हे हिंसावादी क्रियापद इथं कशाही बरोबर कशाही अर्थी वापरतात.. म्हणजे इथं मुलींना प्रपोज मारतात.. मारतात म्हणजे शब्दशः लागेल असा मारतात हो.. फ़ार serious नसेल तर कधी सहज ट्राय मारतात..लेक्चर बंक मारतात. एकमेकांवर जोक मारतात. इतरत्र संधी साधतात पण इथं chance मारतात. येवढचं नाही तर टपरीवर कटिंग मारतात. दिवसभर एवढी मारामारी केल्यावर मग कंटाळुन संध्याकाळी सायकल नाहीतर गाडी मारत घरी जातात..
तुम्हाला जोक सांगायला, ऐकायला आवडतात का? तर मग कोल्हापुरकर ग्रुप तुमच्यासाठी योग्य प्लॅटफ़ॉर्म आहे. इथं कोणताही PJ चालतो.. कितीही जुना, पांचट, अर्थहीन.. द्वापारयुगात सांदिपनी रुषींनी आश्रमात कधीतरी पोरांना सांगितलेला आणि त्यानंतर वर्षानुवर्षे मुखोद्गत होऊन चालत आलेला Antic PJ ऐकवुन तुम्ही गडागडा लोळेपर्यंत लोकांचा हशा घेवु शकता. ‘हसा आणि हसु द्या’ या तत्वानं जगणारी सात्विक लोकं आहेत ही. इथं शाहु महाराजांचा उल्लेख तुम्ही गल्लीत रहाणाऱ्या मित्राला बोलावता तसं एकेरी करु शकता. कारण इथं सगळेजणच स्वतःला शाहु महाराज समजत असतात.
कोल्हापुरकर जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी स्वतःची भाषा, बोलण्याची लकब, आवाजाचा चढऊतार (अम्म तसा चढच फ़क्त..) सोडत नाहीत.. पंचगंगेच्या पाण्यातच याचं गमक सापडेल बहुतेक.. अगदी अंटार्टिकाच्या बर्फ़ात नाहीतर अमेझॉनच्या खोऱ्यात सदाहरित जंगलात कुठेही तुम्हाला भावा sss SSS अशी आरोळी ऐकायला आली तर आपलाच कोणीतरी कोल्हापुरचा स्नेहबंधु जवळपास आहे हे ओळखावे. इतका बंधुभाव जपणारी माणसं जगात इतर कुठं सापडतील असं मला तरी वाटत नाही. ज्युनिअर पासुन सिनीयरपर्यंत, कंड्क्टरपासुन शिपायापर्यंत कुणालाही हे लोक भाऊ करुन टाकतात. उद्यापरवा कोल्हापुरच्या एखाद्या मुलीनेही तुम्हाला भावा म्हणुन हाक मारली तर फ़ार मनाला वैगेरे लागुन घेवु नका. भावा हे मित्रा सारखं ग्रुहीत धरुन चला.
काही मोजके अपवाद वगळता राग म्हणून काय असतं ते कोल्हापुरकरांच्या जवळपासही फ़िरकत नाही. मी तर म्हणेन राग यांना यायच्याआधी दहा अंक मनात मोजत असेल.. आणि स्वतःच शांत होऊन निघुन जात असेल. म्हणजे कोणी यांना शिवी जरी दिली तर "कसलं यमक जुळवलंय भावा.. जिकलस की" म्हणुन पाठीवर थाप देतील.
मला वाटतं..कोल्हापुर म्हणजे महाराष्ट्राचं पंजाब आहे. दिलखुलासपणा हा यांच्या अंगात भिनला आहे. विचार करुन बोलनं वैगेरे यांना जमतच नाही. तसलं ते पुणेरी वारं कोल्हापुरात येता येता वाटेतच कोरडं झालं.. कोल्हापुर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आल्याने इथं या बाबतीत दुष्काळच आहे. मनात येईल ते हे लोक तोंडावर बोलुन जातात. म्हणजे एखादा राजकारणी विरोधी पार्टी च्या सभेत "तुमचा पुढच्या निवडणुकीत असा काटा काढणार आहे" असं म्हणुन ठरलेले internal party मनसुबे रागारागाने सांगुन गेला तरी फ़ारसं नवल नसावं..
कोल्हापुरकरांची काही स्फ़ुर्तिस्थाने आहेत. यांचा कायम उल्लेख तुम्हाला बोलण्यात कायम आढळेल. रंकाळा, शिवाजी पेठ, राजाभाऊ भेळ, फ़डतरे मिसळ, पाटाकडची तालिम.. आणि बरंच काही.. या कोणत्याही विषयावर हे लोक तासनतास बोलु शकतात.
पण यातही एक अस्सल टिपिकल कोल्हापुरी जागा आहे. शिवाजी पेठ. इथले लोक खरे native कोल्हापुरी आहेत. तुमच्या ग्रुप मध्ये या किंवा जवळपासच्या परिसरातले कोणी असतील तर तुम्हाला खरा कोल्हापुरी ठसका कळेल. इथला प्रत्येकजण कुठल्याना कुठल्यातरी मंडळात असतो.. मंडळाच नाव पण काय तर.. मैं हु ना ग्रुप.. नाद करायचा नाय गणेश मंडळ.. पाटाकडची तालीम मंडळ.. यांची ब्रिदवाक्यं पण तशीच अर्थपुर्ण.. "खटक्यावर बोट जाग्यावर पलटी" "आमच्याशिवाय हायेच कोण?" "घास आहे का कुणाचा?".. प्रत्येकजण आपल्या मंडळाचा committed उत्साही fulltime कार्यकर्ता असतो.. आणि या हातावर मोजता येण्याएवढी सदस्यसंख्या असणाऱ्या मंडळाची किर्ती तो मनमुराद पसरवत असतो..
प्रत्येक मंडळ एखाद्या तालिमीशी संलग्न असतं.. कोल्हापुरी लोक या मंडळांच्या कथा वर्षानुवर्षे सांगत असतात. कारण त्या प्रत्येक तालिमीमागे तसाच मोठ्ठा पिढ्यानपिढ्यांचा इतिहास असतो. या तालिमीही अशा की इथं दंड, बैठका, कुस्त्ती याबरोबरच कॅरम, पत्ते असल्या खेळांचही प्रशिक्षण दिलं जातं. हे सगळं सांगणाऱ्या मित्राची तब्येत बघुन कधीही विश्वास बसणार नाही की हा कधी तालिमीत सोडा.. तालिमीसमोरुनही गेला असेल..
मागच्या गणपतीच्या वेळी झालेल्या भांडणात आमच्या ग्रुप चे ५ लोक पोलिसांनी कसे पकडुन नेले. आणि नको तिथं चार काठ्या मारुन पुन्हा सोडुन कसे दिले. ही गोष्ट अगदी अभिमानाने छाती फ़ुगवुन सांगतात. अशा अनेक भांड्ण आणि मारामाऱ्या यांच्या कथा तुम्हाला चविने आणि दर वेळी दाद देवुन ऐकायला लागतील. या मंडळांच्या विसर्जणाच्या मिरवणुकाही तशाच.. डॉल्बींच्या भिंती काय.. लायटींग काय.. बेभान नाचनारी पोरं काय... मला तर कधीकधी वाटतं असल्या वातावरणात ट्रॅक्टरमध्ये अवघडुन बसलेला गणपतीच कधी तरी सगळं झुगारुन "काला कौआ काट खायेगा" च्या तालावर नाचायला लागतो कि काय…
हे लोक आपल्या घरी किती जुनी तलवार आहे असल्या गोष्टी ऐकवतात. मला आजपर्यंत कळलेलं नाही असल्या बिनकामी गोष्टी घरात धुळ खात ठेवुन हे लोक करतात काय? आहेतच तर त्याचा काहीतरी वापर तरी करावा. लोणच्यासाठी कैऱ्या कापायला जरी त्याचा उपयोग होत असला तरी माझी हरकत नाही.. असो..
का तुम्हाला सातारकर ग्रुप मध्ये जायचं आहे? तर मग तुम्हाला ज्या विषयावर बोलायचं आहे त्याचा पुरता अभ्यास करुन जावं लागेल. कारण उत्तरेहुन पुण्याकडून येणारे उष्ण सांस्क्रुतिक ’शिष्टा’चाराचा प्रवाह आणि दक्षिणेतुन कोल्हापुरकडुन येणारा थंड रांगडा प्रवाह एकत्र येऊन काहीतरी मस्त उबदार तात्विक वातावरण इथं तयार झालं आहे असं माझं एक भौगोलिक cum सामाजिक निरिक्षण आहे. याच हवामानाच्या परिणामांमुळे लोक इथं रात्ररात्रं सभा टाकू शकतात. न थकता.. न कंटाळता.. सभांचे विषयदेखील गांगुलीला ओपनिंग द्यावी का नको इतकया हलक्याफ़ुलक्यापासुन अंधश्रद्धा विरुद्ध science इतके जड असु शकतात. प्रेम, धर्म, वास्तववाद, कला असल्या अगम्य विषयांवर तर यांचं प्रभुत्व आहे. इथं प्रत्येकजण स्वतःचा मुद्दा सांगायला आणि पटवायला टपलेला असतो. सगळ्यांचा हाच stance असल्याकारणाने कधी कधी नकळत वादविवादाचे कलहात रुपांतर होते.
सातारकरांचे साताऱ्यावर विलक्षण प्रेम आणि अभिमान आहे हे अधीच जाणुन घ्या. तसंच ते कोल्हापुरकरांनांही आहे. पण या दोन्हींत जमीन अस्मानाचा फ़रक आहे. तुम्ही कोल्हापुरकरांवर शाहु महाराज ते फ़डतरे मिसळ कशावरुनही जोक मारुन फ़ार फ़ार तर एका शिवीवर सुटू शकता.
किंवा कावलायस काय? डोक्यावर पडलयस काय? असलं काहीतरी म्हणतील. कारण त्रागा व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धतच आहे. पण सातारकरांच तसं नाही. तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख "ते रयतवाले कोण रे पाटील कोणीतरी" असा ‘कर्मवीर’शिवाय एकेरी केला म्हणून तुमच्या चांगल्या मैत्रीला तडे जाण्याइतपत मतभेद करुन घ्याल.
सातारकरांच मत सह्याद्रिचं सौंदर्य साताऱ्यात सुरु होऊन तिथंच कुठेतरी संपतं असं आहे. महाबळेश्वर, सज्जनगड, चाळकेवाडी.. शेकडो गोष्टींवर हे लोक गप्पा मारतील. ठोसेघरच्या धबधब्याची वर्णनं ऐकवुन तर भर उन्हाळ्यात तुमच्या अंगावर शहारे आणतील.
तुम्हाला एखादी आधी यमक, मग शब्द आणि मग कुठेतरी शेवटी आशय अशा आडमार्गाने सुचलेली मोडकीतोडकी कविता ऐकवायची असेल. किंवा एखादी ड्रॉईंग शीट सरांनी rework शेरा मारुन परत दिली म्हणुन त्याच शीटच्या मागे त्याच सरांचं काढलेलं कार्टून दाखवायचं असेल. सांगलीकरांकडे जाण्याची चूक करु नका. कारण हे लोक जन्माने समीक्षक आहेत. याच critic gene च्या प्रभावामुळे हे लोक तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल असल्या सुधारणा आणि टीका ऐकवतील. कोल्हापुरकरांकडे गेलात तर कौतुक करुन क्षणभर तुम्हाला शेक्स्पीयर, लिओनार्दो दा व्हिंची, मायकल ऐंजेलो पासुन ते कुसुमाग्रज, पाडगावकर अशा प्रतिभावंतांमधून स्वप्नसफ़र घडवुन आणतील. त्यापेक्षा सातारकरांकडे आपला कलाविष्कार सादर करा आणि यथासांग विवेचन ऐकुन घ्या. पंधरा एक मिनीटाच्या आपल्या creative आविष्कारावर हे लोक तासतासभर भरभरुन बोलत आहेत याचंच तुम्हाला समाधान मिळुन जाईल.
तुम्हाला एखादी मुलगी आवडली आहे कॉलेजमध्ये? तुम्हाला तुमची प्रेमकथा कुणालाही ऐकवावीशी वाटली तरी सांगलीकरांच्या वाटेला चुकुनही जाउ नका. तुम्ही आपलं तुमच्या मनातलीविषयी मनापासुन काहीतरी सांगायला जाल आणि "कोण? ती? ती जरा तिरळी बघते का रे? " "मला तर मंद वाटते ती" असलं काहीतरी परखड मतप्रदर्शन करुन तो तुमच्या प्रेमाचा फ़ुगा फ़ुगायच्या आधीच पंक्चर करेल.
असली गोष्ट कोल्हापुरकरांना सांगा.. हे लोक तुम्हाला फ़ुल्ल जिकवतील. अजुन कशात काही नसताना वरातीच्या घोडीवर नेऊन बसवतील. Confidence वैगेरे काही हवं असेल तर इथुन भरभरुन मिळेल. सरळ रस्त्यावरुन जात असताना तुम्हाला हे लोक प्रपोजच्या दारात नेऊन ठेवतील. प्रसंगी मागुन धक्काही देतील. पण यापेक्षा सगळ्यात चांगला सल्ला देतो. सातारकरांना सांगा. या विषयावर authority असलेले हे लोक तुमचं ऐकुन घेतील. त्यांचे अनुभव सांगतील.या वैचारिक आदानप्रदानात मस्त गप्पा रंगतील. काही नाही झालंच तरी फ़ुगा तरी तुर्तास शाबुत राहील..
या लोकांविषयी मी तासनतास बोलत राहु शकतो.. कारण सगळे आहेतच तसे.. मला हे सगळेजण त्या त्या वेळी तसे तसे भेटले हे मला मिळालेलं गिफ़्ट आहे. मला या सगळ्यांतले बरेचसे चेहरे जसेच्या तसे आठवतात. यांच्या जमवलेल्या बऱ्याचशा चांगल्या वाईट आठवणी आहेत माझ्याकडे.. लिहित राहिलो तर हनुमानच्या शेपटीसारख्या वाढतच राहतील. तेव्हा कोणी आग लावायच्या आधी मी स्वतःहुन आवरतं घेतो.
कोणीतरी विचारेल.. तु यापैकी कोणत्या ग्रुप मध्ये होतास?..किंवा तुला यातला कोणता ग्रुप आवडतो?.. मी फ़ार फ़ार तर हसुन सांगेन..
कसं असतं तुम्ही जर सच्चे खवय्ये असाल तर मग भडंग काय, तांबडा पांढरा रस्सा काय किंवा कंदी पेढे काय सगळ्या चवी तशाच जीभेवर रेंगाळत राहतात.. वेगवेगळ्या.. वैशिष्ट्यपुर्ण.. पण तशाच हव्याहव्याशा..


अमित पवार.. amitpawar21@gmail.com

Monday, September 15, 2008

व्यवहार




जगातली प्रत्येक गोष्ट एक व्यवहार आहे असं वाटत नाही तुम्हाला?

म्हणजे बघा, कधीतरी रस्त्यावरच्या भिकार्याच्या पारडयात तुम्ही एका हाताने पैसे टाकता, आणि दुसर्या हाताने पुण्य खिशात टाकता.. काही लोक पुण्य मानत नाहीत.. मग ते लोक दयेच्या बदल्यात समाधान घेतात..

देवाला नारळ वाढवतात, त्या बदल्यात नोकरी मागतात.. अकरा रुपये देवून मार्क मागता.. कधी कधी तर देवाकडे नवस बोलतात आणि कार्य पुर्ण झाल्याची पक्की खात्री झाल्याशिवाय फेडतही नाहीत.. म्हणजे या व्यवहारात देवावरही त्यांचा विश्वास नसतो.. काय सांगावं.. अभिषेक, पुजाअर्चा सगळं करुन घ्यायचा आणि काम करायचं तेवढं विसरुन जायचा..

कामाच्या बदल्यात पगार.. मदतीच्या बदल्यात मदत.. वेळेच्या बदल्यात वेळ..

आणि प्रेमाच्या बदल्यात प्रे... अं.. इथं मात्र अडखळायला होतं..

प्रेमाचे व्यवहारच का फ़सतात? इथंच नेहमी हिशोब का लागत नाही?

कदाचित प्रत्येकाच्या प्रेमाची currency वेगवेगळी असते..

ती तिकडे डॉलरमध्ये मोजकंच हसते, आणि तुमच्या रुपय़ांमध्ये ते लाखमोलाचं भरतं..

कदाचित प्रेम मोजताच येत नाही यामुळे असेल...

म्हणजे तुम्ही इकडे प्रेमाचे चेक भरभरुन पाठवत राहता.. पलीकडे कोणी कधी एनकॅशच करत नाही.. तुमचा balance संपला तरी पलीकडच्या account ला पत्ता लागत नाही..

म्हणुन वाटतं.. प्रेमाच्या हिशोबवहित फ़क्त एकच column असतो..खर्चाचा... जम्याशी पडताळा असली भानगडच नसते तिथं..



चॉकलेट

चॉकलेट

कॉलेजच्या दिवसातील गोष्ट..
रोज रात्रीचं जेवण झालं की मी घरी फोन करण्यासाठी जायचो. त्यादिवशीही तसंच शेजारच्या दुकानात कॉईन बॉक्सवरुन फोन करायला गेलो होतो. मला एकुणच ही स्टेशनरीची दुकाने फ़ार आवडतात. नविन वह्या, पुस्तके, पेन, रंग, ब्रश.. सगळंच मला फ़ार आवडतं.. मस्त वाटतं.. म्हणुन मग मी बहुतेकदा तिथं वेळ काढतो. पेन बघतो.. मिळणार नाही माहित असुनही उगीच विचारतो “१० नंबरचा फ़्लॅट ब्रश आहे का हो?”..
तेव्हाही असंच फ़ोन वर बोलत होतो.. फोन चालु असतानाच कोणीतरी बाई मागुन दुकानदाराला म्हणाल्या "जरा निशु कडे लक्ष देता? दोन मिनीटात फोन करुन आले".. आणि STD च्या काचेच्या रूममध्ये गेल्या.. माझं फ़ारसं लक्ष नव्हतं.. फोनवर आपलं नेहमीच बोलणं चाललं होतं.. घरच्यांशी बोलतात तसलंच.. जेवण झालं? पाउस आहे? अभ्यास? पुढच्या आठवड्यात घरी येतो आहेस? नाही नाही.. हो.. झालं..
इतक्यात मागुन पायाला काहीतरी लागलं.. मागे वळुन बघतो तर दोन वर्षाची एक छोटीशी गोड मुलगी.. पायाला तीनं घट्ट मिठी मारली होती.. मी फोन ठेवला.. दुकानदार काका ते पाहुन हसुन म्हणाले.. "सोड बाळा निशु.. सोड त्यांना.. चॉकलेट देणार नाही हं मग"..
छोटीशी मुलगी होती.. दिड एक वर्षाची.. निरखुन पाहणारे मोठे काळेभोर डोळे.. गोबरे गोबरे गाल.. पांढरा फ़्रॉक.. त्यावर लाल ठिपके.. फ़ार सुंदर.. निरागस..
तिला मी कोणीतरी ओळखीचा वाटलो असेन.. म्हणुन जवळ आली असेल.. मी कशीबशी तिची मिठी सोडवली.. ती तशीच वर माझ्याकडे पाहत होती..
मला का काय माहीत वाटलं तिला उचलुन घ्यावं.. मी तिला घ्यावं म्हणून सहज हाथ पुढे केले.. तिला काय खात्री पटली काय माहीत.. पट्कन ओठांवर हसू पसरलं.. तिनं लगेच हाथ उंचावले.. मी तिला उचलुन घेतलं.. तशी माझ्याकडे लहान मुलं येतात.. पण हिची अजिबातच ओळख नव्हती.. तरी लगेच आली.. दुकानदार काका पुन्हा हसुन म्हणाले.. "शेजारच्यांची आहे.. निशा.."..
ती अजुन माझ्याकडेच बघत होती.. केस..चश्मा..डोळे..शर्ट.. छोट्याशा मऊ हातानं गालावर हात फ़िरवला.. खिशात हात घातला..काहीतरी सापडलं.. तेव्हाच्या आमच्या ऐपतीनुसारची वीसाची नोट सापडली होती तिला.. मी कशीतरी ती नोट तिच्या हातातुन काढुन घेतली.. आणि मागच्या खिशात ठेवली.. काहीतरी खेळायला द्यायचं म्हणुन किचेन दिलं तिच्या हातात.. मस्त खेळणं मिळालं तिला.. पण दोनेक मिनीटातच त्याचा कंटाळा आला.. तिला काउंटर वर लाल फोन दिसला.
तिकडे हात लांबवू लागली.. म्हणुन मग शेवटी तिला काउंटर वरच बसवलं.. तिला त्या फोनला कोणी कधी हात लावु दिला नसेल याआधी.. आईला पाहुन कुतुहल असेल कदाचित.. सगळी बटणं दाबुन झाली.. सगळं खेळुन झालं.. मी फ़क्त ती पडत नाही हे बघत शेजारी उभा होतो.. आता त्या फोनचा आपल्याला काही उपयोग नाही हे कळलं होतं तिला..
तिला खेळायला काय द्यावं बघत असतानाच मला तिथं एक कागद दिसला. पटापट कागदाच्या आडव्या तिडव्या घड्या घातल्या. ती हे सगळं बारकाइने बघत होती.. एक मस्त विमान केलं.. तिच्यासमोर ठेवलं.. तिनं त्या विमानाकडं बघितलं.. मग माझ्याकडं बघितलं..तिला ते काय केलय काही ओळखलं नाही..चेहर्यावर उत्सुकता दाटली होती. मग मीच ते घेतलं आणि मागुन एक फ़ुंकर देवुन ते हवेत भिरकावलं.. ते उडताना पाहुन तिला फ़ार मजा वाटली. मग तिला काउंटर वरुन खाली उतरवलं.. तुरुतुरु जावुन ती ते घेवुन आली. पुन्हा उडवण्यासाठी माझ्याकडे दिलं.. मी पण तिच्या छोट्याशा मुठितुन ते सोड्वुन घेतलं..चुरगाळलेल्या घड्या पुन्हा सरळ केल्या.. पुन्हा अलगद सोडुन दिलं.. आमचा हा खेळ बराच वेळ चालला असेल.. मस्त गट्टी जमली आमची.
तेवढ्यात तीच्या आईचा फोन संपला.. त्यांनी तिला उचलुन घेतलं.. माझ्याकडे उगीच क्रुतज्ञतेच्या नजरेनं पाहुन हसल्या.. "थॅन्क्स हं.. फ़ार त्रास तर नाही ना दिला?" असं काहिसं म्हणाल्या.. आणि बिलाचे पैसे द्यायला मागे वळल्या..
माझं काम तसं झालं होतं.. पण पाय उगीच अडखळला होता. त्या छोटीने पैसे पाहिल्यावर आईकडे चॉकलेटचा हट्ट धरला. शेवटी आईने तिला एक ईकलेयर्स च चॉकलेट घेवुन दिलं. रॅपर काढुन चॉकलेट हळूच तोंडात भरवलं.. फ़ार खुष झाली.. जणु सगळं काही मिळालं असा आनंद होता तिच्या चेहऱ्यावर..
पैसे देवुन झाल्यावर त्या "टाटा कर निशु काकांना" असं काहीतरी म्हणुन त्या निघाल्या.. आता मला विसरली असेल असं वाटलं होतं मला..पण ती गोड हसली.. आणि वेडावाकडा हाथ हलवुन टाटा केलं..
मी पण नकळत हसुन हात वर केला.. आणि इतक्यात काहीतरी खटकलं.. पांढरट साडी.. गळ्यात मंगळसुत्र नाही..कपाळ पण.. एकदम सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.. क्षणात सगळया आनंदाची जागा गर्द विचारांनी घेतली.. उगीचच ठोका चुकल्यासारखं काहीतरी झालं..
मी भानावर आलो तर त्या निघाल्या होत्या.. जाता जाता आ करुन मला तिनं तोंडातलं चॉकलेट दाखवलं.. मला काय वाटलं काय माहीत मी उगीच खोटा रडवेला चेहरा करुन चॉकलेट मागण्यासाठी हात पुढे केला. काही कळायच्या आतच तिनं तोंडातलं चॉकलेट काढुन माझ्या हातावर ठेवलं.. आणि पुन्हा हसली..
बघता बघता त्या अंधारात निघुन गेल्या. मला उगिच आज एक नातं कमावल्यासारखं वाटून गेलं.. आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीलाही काही देताना किती विचार करतो.. आणि ती छोटिशी.. देवानं तसं तीचं बरच हिरावुन घेतलं.. तसं आमचं काहीच नातं नव्हतं.. १५ -२० मिनिटांची ओळख..
आणि हे चॉकलेट.. म्हणजे सगळं काही होतं तिच्यासाठी.. काही वेळापुर्वी.. पण चेष्टेनं मागितल्यावर क्षणाचाही विचार न करता तिनं ते दिलं..
खरंच निरागस निरागस म्हणतात ते आणखी काय असतं हो..
हातातलं ते चिकट झालेलं चॉकलेट पण एव्हाना गळुन पडलं......
पुन्हा बऱ्याचदा त्या दुकानात जाणं झालं.. पुन्हा कधी ती निशु दिसली नाही..
ते हसरे बोलके डोळे.. छोटे छोटे हात.. ते चॉकलेट.. ते तेवढं डोळ्यासमोर येतं कधी कधी..


अमित पवार.. amitpawar21@gmail.com

Sunday, September 14, 2008

Prajakt



दूर पैंजणांचा मंजुळ नाद होत होता. हळुहळु आवाज स्पष्ट होत गेला.

गवतावरुन नाजुक पावलं समोर आली. आज पुन्हा ती फ़ुलं गोळा करायला आली होती.

गोरी गोरी पोर.. कपाळावर शोभनारी चन्द्रकोर..

आजही प्राजक्ताचा तसाच सडा पडला होता.. पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं. काहितरी चुकलं होतं. कोणीतरी रुसलं होतं..

तिनं वाकुन ऒंजळीत फ़ुलं घेतली. डोळे मिटुन गंध श्वासात घेतला..

एवढ्यात कोणीतरी हळु आवाजात धीटाईनं पुटपुटलं.. ती भानावर आली..

आणखी तोच आवाज आला..

मोगरा तेवढा केसात माळला.. प्राजक्त मात्र पायाशीच रुळला..

ती खुद्कन हसली..क्षणभर थांबली..

एकाएकी ओठांची लकेर सरळ झाली.. गालावरची खळी विरुन गेली..

अंतरी कंठ दाटला.. डोळ्याचा बांध मात्र सुटला..

गालावरुन ओघळत एक टप्पोरा थेंब ओंजळीत पडला..

ते पाहुन प्राजक्ताचा वृक्ष शहारला.. गर्भगळीत गात्रानं पुन्हा फ़ुलांचा सडा टाकला..

ती डोळे पुशीत उठली.. ओंजळभर फ़ुलं घेवुन मागे फ़िरली..

मानेवर रेंगाळणार्या गजर्यातील फ़ुलं कुत्सित हसली..

कारण..मोगरा तेवढा केसात माळला.. प्राजक्त मात्र पायाशीच रुळला….”


Thursday, July 24, 2008

Asach kahitari..


मी तसं फार सुंदर असं स्वप्न कधी पाहतच नाही.. खरंच.. मला पडणारं फार चांगलं असं पेटेंट स्वप्न म्हणजे.. मस्त पहाट आहे धुक्यातून वाट शोधत सूर्याची तिरपी किरणे डोकावत आहेत.. थंड पण हवं हवस वाटणार वारं सुटलं आहे.. मी मस्त अंथरुणात लोळत आहे.. घट्ट मिठीतअ उम्म् ..(for sake of sanskars) सध्या उशी आहे असं समजा.. ती हळूच मिठी सैल करत कूस बदलते.. मी तीला आणखी जवळ घेतो.. ..आणि.. आणि एकदम mobile चा अलार्म वाजतो.. माझ्या सुखी स्वप्नाचा शेवट असा दु:खद वास्तववादी होतो नेहमी.. अशा वेळी mobile मध्ये गजराची सोय करण्याची अक्कल लढवणारा जर सापडला तर.. तर तोच mobile त्याला फेकून मारला असता..उठन्याची तसदी न घेता दूसरा वार करणे शक्य नाही म्हणुन नाहीतरअसा रंगाचा भंग करणारा mobile म्हणजे शत्रु वाटू लागतो मला.. आत्ता कळलं मला पहाटे आत्महत्या करणार्यांची संख्या जास्त का आहे ते...

एक तर माझ्या स्वप्नाची वेळ चुकत असावी किंवा या गजराची.. स्वप्नाला दोष देण्यात अर्थही नाही हो.. ते काय कधीही पडायचं..पण mobile च काय.. आजपर्यंत एकदाही माझं हे स्वप्न पुर्णत्वाला जाऊ दिलं नाही..ऐन वेळी ती अलार्म ची नीरस धुन चालू होते.. आजपर्यंत मला दोन धून अजिबात आवडल्या नाहीत.. एक ती खेळन्यातल्या mobile वाली छैया छैया. आणि दूसरी म्हणजे माझ्या alarm ची धून.. कुठे वाजायाला लागली की मी जन्मजात बहिरा का जन्मलो नाही असं वाटायला लागत.

गजरावरुन आठवलं..माझ्या एका मावसभावाला घड्याळाचा गजरच ऐकू येत नाही.. शेजारचं घड्याळ मस्त उशीखाली घेवून तसाच वाजवत ठेवतो तो.. गजर म्हणजे जणू काही अंगाईच्या सुरुवातीचा आलाप वाटतो त्याला..आणि अशा या निद्राप्रेमीवर परिस्थितिने अशी काही वेळ आणली, की त्याला नोकरीसाठी पहाटे सहाची लोकल पकडावी लागायची. पहिले काहि दिवस ठरल्याप्रमाणं त्याला टॅक्सीचा खर्च सोसावा लागला. शेवटी त्याने वेगवेगळ्या आवाजात वाजणारी चार घड्याळं विकत घेतली. रोज रात्री तो चार घड्याळे पाच पाच मिनीटांच्या अंतराने गजर लावून वेगवेगळ्या, सहजासहजी हाती लागणार नाहीत अश्या ठिकाणी ठेवायचा.. एक टेबलावर.. एक कपाटावर.. एक कॉटखाली.. आणि एक टेबलाचा ड्रॉवर अर्धवट उघडुन त्यात.. अशी व्यवस्थित व्युहरचना करुन झोपायचा. रोज पहाटे ती घड्याळे रनशिंग फुंकल्यासारखी एकापाठोपाठ वाजायाची आणि हा प्रत्येकाचा समाचार घेण्यासाठी इकडुन तिकडे पळायचा. या सगळ्या धावपळीत तो झोपेतुन कधी उठायचा त्याचे त्यालाच कळायचे नाही.

हे प्रकरण देखील काही दिवस यशस्वी चालले.. नंतर या गोष्टीची देखील त्याला इतकी सवय झाली की एक गजर वाजला की तो अर्धवट झोपेतच ओळीने एक एका घड्याळाची बटणे सफ़ाईने बंद करायचा आणि उशीखाली डोके लपवून पुन्हा आपल्या निद्राराधनेत मग्न व्हायचा.

माझा एक मित्रतर weekends ना देखील गजर लावुन झोपतो. दर सुट्टीच्या दिवशी त्याच्या गजराने आम्ही सगळे उठायचो आणि हा मात्र गजर बंद करुन आरामात पुन्हा झोपी जायचा. एकदा झालं.. दोनदा झालं.. नंतर वैतागून विचारलेच मी एकदा.. तर म्हणतो "मुद्दाम नेहमीच्या वेळचा गजर लावतो weekend ला. नेहमीसारखं उठुन अंथरुणात जेव्हा लक्षात येतं की आज सुट्टी आहे. आणि officeला जायचं नाही, तेव्हा भारी वाटतं. परत झोपी जाण्यात मस्त मजा येते.. तो आनंद मला miss करायचा नसतो".. आता यावर काय बोलणार?.. त्याच्या या साखरझोपेसाठी आमच्या सगळ्यांच्या झोपेत मीठाचा खडा टाकून हा मोकळा होतो नेहमी.

हॉस्टेलवर असताना, PL च्या काळात दररोज पहाटे सहाच्या दरम्यान कुणाचातरी गजर वाजायचा.. अगदी मोठया आवाजात.. बराच वेळ.. नक्कीच आमच्या लॉबीमध्ये पहाटे उठून अभ्यास करणारा कोणीतरी scholar होता. थोडा वेळ झाला की असह्य होउन खालच्या लॉबीतून एक सणसणीत शिवीवजा comment यायची. आणि तो वाजणारा गजर आपोआप बंद व्हायचा. हे अगदी परिक्षेपर्यंत नित्यनियमाने चालायचं. आमच्या सगळ्यांची इतकी दुषणं घेवुन तो असे कितीसे मार्क पाडणार होता काय माहित.. मला कधीही त्या रहस्यमय अभ्यासु मित्राचा शोध लागला नाही.. आणि इतक्या पहाटे उठुन त्याला शोधण्याची इच्छा पण झाली नाही.

घरी तर यापेक्षा वेगळी तऱ्हा... माझ्या आईला सकाळसकाळी रेडिओ ऐकायची.. खरं तर ऐकवण्याची सवय आहे. म्हणजे त्या तालावर ती अंघोळ, देवपूजा, झाडलोट, साफसफाई सगळी कामं करते. मला त्या रेडिओचा किनकिना आवाज सुरु झाला कि लगेच जाग येते. मग मी आईच्या पहिल्या चहात आणखी अऱ्धा कप वाढवायला सांगतो आणि सोफ़्यावर लोळायला जातो. तिकडे रेडिओचं सुरुच असतं. "आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे सहा वाजले आहेत. थोड्याच वेळात सुरु होतोय कार्यक्रम विचारमंथन..".. आणि मग कोणीतरी विचारवंत.. आरोग्य, ग्रंथ, आहार, व्यायाम असल्या अगम्य विषयांवर चर्चा सुरु करतात. मला हे कळत नाही.. सहा सकाळी नाहीत तर पहाटे लोकांच्या झोपेच्या वेळी वाजतात हे या बाईच्या लक्षात कसं येत नाही.. बरं असो.. इतक्या पहाटे इतक्या मोठ्या विचारवंतांना झोपेतून जागे करून असलं विचारांचं आदानप्रदान करण्याची शिक्षा का बरं देतात हे निर्दयी लोक? ते संपलं रे संपलं की मग कृ॒षी क्षेत्रावर काहीतरि कार्यक्रम सुरु होतो.. आता मला सांगा, शेतकरी पहाटे उठल्यावर पहिला धारा काढेल.. वैरनी आणायला जाईल.. का ह्याच्या युरिया आणि नायट्रोमोनोफॉस्फेटचं प्रमाण लिहुन घेत बसेल.. मी असल्या निरर्थक गोष्टी पहिल्या चहाबरोबर ऐकून दिवसाची सुरुवात करतो.

हे नाहि झालं तर शेजारी कोणीतरि गायत्रीमंत्र लावतं.. अनुराधा पौडवालनं दोन मिनिटात अर्थ न कळता, म्हणलेला तो मंत्र आम्ही repeat mode मध्ये पाउण तास ऐकतो. ते कमी कि काय म्हणुन उडपी काकूंना जोश येतो.. मग वेंकटेश आरतीची revision होते. (म्हणून त्यांच होटेल चालत नसावं बहुतेक. भल्या पहाटे असल्या काकडआरतीने जागं केल्यावर कुठला देव कल्य़ाण करेल सांगा. ) लोकांच्या धार्मिक भावनांवर मला काही आक्षेप नाही. उदबत्ती, गंध, कापुर, फुलं इथवर सगळं संपत असेल तर.. त्या अशा सकाळी उफ़ाळुन येतात याचा मला खरा राग आहे. माझ्या नास्तिक होण्यात अशा शेजार्याचा मोठा वाटा आहे.

या सगळ्या शहरी त्रासाने कंटाळून मी सुट्टीत गावी जातो.. तिकडची पहाट म्हणजे काय सांगता? मस्त नदीकीनारी गाव आहे आमचं.. भल्या पहाटे उठुन आजी पाणी तापवायला चूल पेटवते.. मस्त गोधडीत मी लोळत असतो. पण तिथंही माझी झोपमोड करायला एक शत्रु तैनात केला आहे परमेश्वराने.. गावाकडच्या घरी एक कोंबडा पाळला होता. जाडजूड.. मोठ्ठया लाल तुर्याचा हा अतिउत्साही प्राणी.. I mean पक्षी कौलांवर उंच जाउन बसायचा.. आणि कोणतीही काळ वेळ न पाहता मोठ्ठ्यानं आरवायचा.. अगदी कधीही.. पहाटे चार.. सकाळचे दहा.. दुपारी सगळे जेवुन जरा पहुडले कि.. कधीही.. म्हणजे हा नक्की कोणत्या Time Zone मध्ये जन्मलाय हे कोडं आहे मला.. का याची आई अंडं देताना jetlag मध्ये होती देव जाणे.. लोकांच्या नाकी नऊ आणले होते यानं. कोंबडं झाकलं तरी तांबडं फ़ुटायचं राहत नाही म्हणतात. इथं कोंबडं झाकलं नाही म्हणुन लोकांची रागानं तांबडं व्हायची वेळ आली होती. असल्या आमच्या या कम्युनिस्ट विचारांच्या कोंबड्याचं जवळपासच्या कोंबड्या सोड्ल्या तर गावात कुणाशीही पटलं नाही. शेजारी पाजारी तर वैतागले होते. शेवटी एके दिवशी व्हायलाच हवं होतं असं एक विपरीत झालं. एकाएकी तो कोंबडा गायब झाला. मला तो दिवस चांगला आठवतो. कधी नाही ते दुपारी भरपूर जेवुन मस्त झोपलो होतो दोन तास.. (शेजारच्या यादवांच्या घरातुन कोणीतरी चिकन रस्सा पाठवून दिला होता बहुतेक.. असो..)

माझी आणि मोठ्या विचारवंतांची बहुतेक मते जुळतात, पण या माझ्या हक्काच्या विषयावर मात्र जरा दुमत आहे. किंवा त्यांचे विचार चुकीच्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवले गेले असावेत. पंडीत नेहरू पाचच तास झोपायचे म्हणतात. असतो एखाद्याला निद्रानाशाचा आजार. झोप लागत नाही तर करणार काय हो बिचारे सांगा मला. याच नेहरुंनी लिहिलेलं वाक्य "आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रु आहे" मी शनिवारी सकाळी शाळेत कितीतरिदा फ़ळ्यावर लिहिलं आहे.. आळस देत..

मला तर वाटतं एखाद्या दिवशी कॉंग्रेसच्या एखाद्या बैठकीत नेत्यांची रात्रीपर्यंत बराच वेळ चर्चा चालली असावी. शेवटी काहिच ठराव होत नाही हे लक्षात आल्यावर आत्ता बराच उशीर झाल्याने तिथंच झोपायचा ठराव संमत झाला असावा. सगळे गाढ झोपले असावेत. गांधीजी पंचा अंथरुन थंडित कुडकुडत कोपर्यात एका कुशीवर झोपले आहेत. सरदार पटेल मस्त घोरत आहेत. जयप्रकाश नारायण, मौलाना आझाद आदी मंडळी आपापली कोपर्यात पहुडली आहेत. साहजिकच या सगळ्यांना इतकं निवांत झोपलेलं पाहुन नेहरुंना त्रागा होत असेल. आणि अशातच संयम सोडुन त्यांनी लिहिलंहि असेल असलं वाक्य. पण म्हणुन काय ते इतकं प्रसिद्ध करायचं. अगदी सुविचार होण्याइतपत.. मोठ्ठ्या लोकांच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रसिद्ध होतात. आणि मुल्यशिक्षणासारख्या विषयांचा syllabus वाढतो.

आजकाल कोण झोपेचा कर्दनकाळ बनून येयील सांगता येत नाहि. कोणी पहाटे मोठ्ठ्यानं विचित्र वाजणार्या reverse horn सह गाडी काढण्याची कसरत करतं. कचरा गोळा करायला गाडी काय येते. कोणी कुकरची शिट्टी काय वाजवतं.. काही सांगु नका. एक झाला कि एक षडरीपु: पाठोपाठ येतात. वैताग येवुन जातो. दोन सुंदर रात्रिंत एक कंटाळवाणा दिवस सुस्तावलाय असं वाटायला लागतं..

पण खरं सांगू.. सकाळी कुणीतरी उठवतं म्हणुन तर पुन्हा रात्रि अंथरुणात शिरायला मजा येते. मस्त दिवसभर आपण स्वप्नाच्या बटव्यात वास्तवाच्या वाळुत पसरलेले चमकदार, काही टोकेरी, वेडेवाकडे रंगीत शंख-शिंपले,खडे गोळा करत भटकतो. आणि रात्री त्या बटव्यातल्या एक एक वस्तु जमेल रुचेल तशा रचत बसतो. दुसर्या दिवशी पुन्हा निघतो शोधायला.. कधी कालचं राहिलेलं काहितरि पुर्ण करायला.. कधी नवीनच सुरुवात शोधायला.. शेवटी कधी तरी मग बटव्याची गाठ सुटतच नाही काही केल्या. गुंता होतो सगळा. कायमची अडकतात..शंख-शिंपलं.. स्वप्नं.. कितीही गजर झाला तरी मग जागच येत नाही.

अमित पवारamipawar21@gmail.com